राजस्थानमधल्या एका 83वर्षांच्या वृद्धानं केवळ मुलगा हवा यासाठी 30 वर्षांच्या महिलेशी विवाह केला आहे. सुकराम बैरवा असं या वृद्धाचं नाव असून वाडवडिलार्जित संपत्तीसाठी वंशाचा दिवा हवा या एकमेव कारणासाठी हा विवाह त्यानं केला आहे. विशेष म्हणजे बैरवाचं एक लग्न जालं असून हा दुसरा विवाह असल्यामुळे तो बेकायदेशीर आहे आणि या अंगानं सरकारी अधिकारी कपास करत आहेत.

राजस्थानमधल्या समरदा या गावात हा विवाहसोहळा पार पडला, ज्यासाठी आजुबाजुच्या 12 गावांमधून गावकरी वधूवरांना आशिर्वाद देण्यासाठी आले होते. बैरवाला पहिल्या बायकोपासून एक मुलगा झाला होता, परंतु तो 20 वर्षांपूर्वी एका दुर्धर आजाराला बळी पडला. बैरवा चांगल्याच मालमत्तेचा धनी असल्यामुळे त्याला या संपत्तीची काळजी घेण्यासाठी मुलगा हवा आहे. त्याला पहिल्या बायकोपासून दोन मुली आहेत, ज्यांचे विवाह झाले आहेत. बट्टो ही बैरवाची पहिली बायको हयात असून तिनंही नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहाला संमती दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलाच्या रुपानं माझ्या संपत्तीला वारस मिळवणं हा एकमेव या लग्नाचा हेतू असल्याचं सुकराम बैरवानं स्पष्ट केलं आहे. राजस्थानमध्ये प्रचंड जमिन व दिल्लीमध्ये प्लॉट असलेल्या आपल्या संपत्तीला मुलगा वारस हवा म्हणून आपण नवऱ्याच्या दुसऱ्या विवाहाला संमती दिल्याचे बैरवाच्या बायकोनं म्हटलं आहे. या विवाहासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करू असं सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
आपल्यासा या प्रकरणाची पूर्ण कल्पना नसून, या गावात भेट देऊ व वस्तुस्थिती जाणून घेऊ असं अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजनारायण शर्मा यांनी म्हटलं आहे.

तहसीलदार व स्थानिक अधिकाऱ्याचं एक पथक स्थापन करण्यात आलं असून अधिक तपास करण्यात येत आहे. सविस्तार माहिती आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार हिंदू व्यक्तिला पहिली पत्नी असताना दुसऱ्यांदा लग्न करता येत नाही. मुलाच्या हव्यासापोटी पहिल्या पत्नीनेही नवऱ्याला दुसऱ्या लग्नाला अनुमती दिल्याचाही आरोप आहे. मात्र, या प्रकरणामुळे मुलीच्या तुलनेत मुलाला किती अतोनात आजही महत्त्व दिलं जातं हे दिसून आलं आहे.