थायलंडमधील मंदिरातून ताब्यात  घेतलेल्या १४७ वाघांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे  ८६ वाघ मरण पावले असल्याची माहिती उद्यान अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. एकेकाळी पैसा मिळवणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटन केंद्र सदृश मंदिरात या वाघांना काही ठेवण्यात आले होते असे सांगण्यात आले.

कांचनबुरी प्रांतातील वात फा लुआंग टा बुआ या मंदिरात गेली काही वर्षे १४७ वाघ ठेवण्यात आले होते, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले होते. त्या ठिकाणी गेलेले पर्यटक या वाघांसमवेत छायाचित्रे काढून घेत असत. या वाघांना तेथून हलवतानाच्या २०१६ मधील मोहिमेत गैरव्यवस्थापनामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली असा आरोप आहे.

मंदिरातून वाघ ताब्यात घेतले तेव्हा त्या  ठिकाणी वाघांच्या बछडय़ांचे मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसून आले. बहुदा तेथून वाघांच्या शरीराचे भाग विकले जात असावेत, त्यातून मोठय़ा प्रमाणात पैसा मिळत होता.

वाघांच्या शरीराचे भाग चीन व व्हिएतनाममध्ये मोठय़ा प्रमाणात विकले जातात. वाघांच्या अवयवात औषधी गुण असतात असा एक चुकीचा समज रूढ असून त्यातून त्यांच्या शरीराच्या भागांची विक्री केली जाते. जे वाघ या सगळ्या दुष्टचक्रातून वाचले आहेत त्यांची संख्या ६१ आहे व त्यांना रचाबुरी प्रांतातील दोन प्रजनन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. वाघांचा मृत्यू जनुकीय रोग किंवा प्रजननाशी संबंधित कारणांनी झाला असावा, असे मत राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव व वनस्पती संवर्धन या विभागाचे पॅट्रापोल मॅनीऑन यांनी व्यक्त केले आहे. जे वाघ जिवंत आहेत त्यांनाही जनुकीय समस्या होत्या, त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असून त्यांना जिभेचा पक्षाघात झाला आहे, त्यांना श्वास घेता येत नाही, आतडी तुटलेली आहेत.

आणखी एक अधिकारी सुनथॉनी चाइवाटना यांनी सांगितले,की अनेक वाघांची दुरवस्था आहे.  त्यांना दुसरीकडे हलवतानाही काही समस्या सुरू झाल्या. जप्त केलेल्या वाघांची योग्य प्रकारे देखभाल केली नाही असा आरोप करण्यात आला असून वाघांना लहान पिंजऱ्यात ठेवल्याने रोग झाल्याचे सांगण्यात आले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाघांचे स्थलांतर एकाचवेळी करण्याची जोखीम पत्करणे योग्य नव्हते, असे मत वाइल्डलाइफ फ्रेंडस थायलंड या संस्थेचे संस्थापक एडविन विक यांनी म्हटले आहे.

या वाघांना ठेवण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था ही सदोष व चुकीची होती असा आरोप त्यांनी केला आहे. थायलंडमध्ये वन्यजीव पर्यटन हा मोठा व्यवसाय असून लाखो लोक या देशाला भेट देतात. पैशाचे आमिष दाखवून पर्यटक प्राण्यांचे जीवन धोक्यात आणतात. तेथे वाघाबरोबर सेल्फी, हत्तीबरोबर स्नान, माकडांसमवेत खेळणे असले अनिष्ट प्रकारही चालतात.