दिल्लीत माणुसकीला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. एका ८६ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला. दिल्लीत नजफगडमध्ये एका शेतात ही घटना घडली. आरोपी ३७ वर्षांचा असून तो प्लंबरचे काम करतो. त्याला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

पीडित वयोवृद्ध महिला छावला गावात राहते. सोमवारी संध्याकाळी ती घराबाहेर दूधवाल्याची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याशी बोलायला आला. ‘आज तुमचा दूधवाला येणार नाही’, असं त्याने खोटं सांगितलं. ‘तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून दूध खरेदी करावी लागेल, ते ठिकाण आपल्याला माहित आहे’ असे त्याने सांगितले. आरोपीच्या बोलण्यावरुन त्याच्या मनात दुसरा कुठला वाईट हेतू असेल, अशी पुसटशी शंकाही तिच्या मनात आली नाही.

आरोपीने त्या पीडित महिलेला आपल्या बाईकवर बसवले व जवळच्या शेतात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. पीडित महिलेचा आरडा-ओरडा ऐकून आसपासच्या परिसरातील लोक तिथे आले. त्यांनी आरोपीला पकडले व पोलिसांना माहिती दिली.

पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपी विरोधात बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली अशी माहिती द्वारकाचे डीसीपी संतोष कुमार मीना यांनी दिली. दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पीडित महिलेची तिच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जलदगतीने खटला चालवण्याचे आश्वासन दिले.

“दिल्लीत सहा महिन्याची मुलगी आणि ९० वर्षांची महिला सुरक्षित नाही. या प्रकरणात जलदगतीने खटला चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उपराज्यपाल आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना पत्र लिहिणार आहे”, असे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.