नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मोसमी पावसाच्या काळात एकूण ८६८ लोकांनी प्राण गमावले असून, त्यात केरळातील २४७ जणांचा समावेश आहे. पाऊस, पूर व दरडी कोसळल्याने हे मृत्यू झाले आहेत असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्राने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये २४७ बळी गेले असून, १४ जिल्हय़ांत २.११ लाख लोकांना फटका बसला आहे. ३२५०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशात १९१, पश्चिम बंगालमध्ये १८३, महाराष्ट्रात १३९, गुजरातेत ५२, आसामात ४५, तर नागालँडमध्ये पावसाने ११ बळी घेतले आहेत. एकूण ३३ लोक बेपत्ता असून त्यात २८ केरळातील तर पाच पश्चिम बंगालचे आहेत. एकूण २७४ जण यात जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रात २६, आसामात २३, पश्चिम बंगालमध्ये २३, केरळात १४, उत्तर प्रदेशात १३, नागालँडमध्ये ११ तर गुजरातेत १० जिल्हय़ांना पुराचा फटका बसला आहे.  केरळमध्ये पूरग्रस्तांसाठी छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यात दोन लाख लोक राहत आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १६३ बोटींच्या साहाय्याने २००० जणांनी मदतकार्य केले. भारतीय नौदलाने ५१ बोटी, १००० जीवरक्षक जॅकेट व १३०० गमबूट केरळातच पाठवले आहेत. दोन दिवसांत हेलिकॉप्टर्सनी सोळा फेऱ्या करून १६०० अन्नाची पाकिटे शुक्रवारी टाकण्यात आली आहेत. तटरक्षक दलाने ३० बोटी व ३०० जीवरक्षक जॅकेट , १४४ जीवरक्षक तराफे दिले आहेत. लष्कराने यात ६० बोटी व १०० जीवरक्षक जॅकेट्सच्या मदतीने मोठय़ा प्रमाणावर मदतकार्य केले आहे.

आसाममध्ये ११.४५ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून, त्यात २७६०० हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. पश्चिम बंगालमध्ये २.२७ लाख लोकांना फटका बसला असून ४८५५० हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. उत्तर प्रदेशात १.७४ लाख लोकांना फटका बसला असून ३३८५५ हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाली.