म्यानमारमधून ८७ हजार रोहिंग्या मुस्लीम शरणार्थी बांगलादेशात आले असून २५ ऑगस्टला उसळलेल्या हिंसाचारानंतर या शरणार्थीनी देशाबाहेर पलायन केले होते. म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी या सगळ्या घडामोडींवर मौन पाळल्याने संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहेत. रोहिंग्या हे म्यानमारमधील मुस्लीम अल्पसंख्याक असून त्यांच्याविरोधात मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला. त्यामुळे भीतीने ते देशाबाहेर पळाले असून बांगलादेशातील छावण्यात त्यांचे लोंढे येतच आहेत.

म्यानमार व बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या रखाइन येथे किमान वीस हजार शरणार्थी एकत्र जमले असून ते बांगलादेशात घुसण्याच्या तयारीत आहेत. बांगलादेशने सीमेवर बंदोबस्त तैनात केला असून दहा दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये हिंसाचार उसळला होता. बांगलादेशच्या एका सीमा रक्षकाने सांगितले, की अनेक लोक बांगलादेशात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना रोखणे अवघड जात आहे, गेल्यावेळपेक्षा मोठय़ा संख्येने ते येत आहेत. जर हे लोंढे असे चालूच राहिले,तर कठीण परिस्थिती निर्माण होईल.

शेकडो रोहिंग्या मुस्लीम कॉक्सबझार येथे आले आहेत. सध्या तेथे पाऊस पडत असून त्यांना निवारा उपलब्ध नाही.

अमीन बेगम या पाच मुलांच्या आईने सांगितले, की येथे गेल्या आठवडय़ापासून पाऊस पडत असून मुलांना सुरक्षित ठेवणे कठीण जात आहे. कॉक्सबझार येथे शरणार्थी कुटुंबांनी सांगितले, की बौद्धांचे जमाव व सुरक्षा दले यांनी अनेक कुटुंबे कापून काढली, अनेक खेडी जाळण्यात आली आहेत.

रोहिंग्या बंडखोरांनी सुरक्षा आस्थापनांवर हल्ले केल्याने त्यांच्याविरोधात लष्कर व जमावाने कारवाई केली. म्यानमारने असा आरोप केला आहे, की बंगाली दहशतवाद्यांनी रोहिंग्या मुस्लिमांची घरे पेटवली, म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी या सगळ्या हिंसाचारकडे डोळेझाक केली असून रोहिंग्यांना दिलेल्या वागणुकीवर मौन पाळले आहे व लष्कराविरोधात शब्दही काढलेला नाही.