करोनाच्या रुग्णांमध्ये बुधवारी सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ८,९०९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ७ हजार, ६१५ झाली आहे. देशातील मृतांची संख्या ५,८१५ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे निम्मे म्हणजे १ लाख ३०३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ४,७७६ रुग्ण बरे झाले असून, २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचे प्रमाण २.८० टक्के आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये १ लाख ३७ हजार १५८ नमुना चाचण्या घेण्यात आल्या. आता सातत्याने एक लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ४१ लाख ३ हजार २३३ चाचण्या झाल्या आहेत. ४८० सरकारी व २०८ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या होत आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) दिली. गेल्या काही दिवसांपासून आठ हजारांहून अधिक रुग्णवाढ होत आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात यश येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यात आणखी १२२ जणांचा मृत्यू

राज्यात बुधवारी करोनाच्या सर्वाधिक १२२ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या २,५८७ वर पोहोचली. गेल्या २४ तासांत राज्यभरात २,५६० रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ७४,८६० वर पोहोचली.

रुग्णवाढीचा वेग मंदावला

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. १ मे रोजी महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण ७.७६ टक्के होते. १ जून रोजी हेच प्रमाण ४.१५ टक्के नोंदविण्यात आले.