तेलंगणमधील वारंगलजवळ असणाऱ्या एका गावामधील विहिरीमध्ये नऊ मृतदेह अढळून आले आहेत. यापैकी सहा जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. गौरीकुंटा गावामधील गोणी शिवण्याचे काम करणाऱ्या एक ४८ वर्षीय कामगाराचे आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे मृतदेह एका विहिरीमध्ये अढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे याच विहिरीमध्ये आणखीन पाच जणांचे मृतदेह सापडले असून त्यापैकी दोन मृतदेह या ४८ वर्षीय कामगाराच्या मुलांचे आहेत. पोलिसांच्या अहवालाच्या आधारे पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

विहिरीमधून मिळालेल्या मृतदेहांपैकी सहा मृतदेह एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असून अन्य एक मृतदेह या कुटुंबाच्या ओळखीतल्या व्यक्तीचा आहे. इतर दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती वारंगलचे पोलिस आयुक्त व्ही. रविंद्र यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. या विहिरीमध्ये ४८ वर्षीय कामगाराच्या मृतदेहबरोबरच त्याची पत्नी, मुलगी आणि तीन वर्षाच्या नातवंडाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शुक्रवारी याच विहिरीमध्ये पुन्हा मृतदेह तरंगताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी विहिरीमधील सर्व पाणी उपसून बाहेर काढले तेव्हा त्यांना विहिरीमध्ये इतर पाच मृतदेह आढळून आले.

या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. असं असलं तरी प्राथमिक अंदाजानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही मृतदेहावर जखमा दिसून आलेल्या नाहीत. मात्र नक्की या लोकांचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विहिरीमध्ये सापडलेले मृतदेहांपैकी कुटुंबाच्या ओळखीतील व्यक्तीचा मृतदेह हा ४८ वर्षीय कामगाराच्या मित्राचा आहे. या कामगाराने आपल्या मित्राला गोणी शिवण्याचं काम असल्याचं सांगून घरी बोलवून घेतलं होतं. तर इतर दोन मृतदेह हे याच ठिकाणी राहून गोणी शिवण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. पण या नऊ जणांबरोबर नक्की काय झालं याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.