तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे एका धातू शुद्धिकरण प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या निषेध आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ९ स्थानिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


तुतिकोरिन येथे उभारण्यात येत असलेले स्टरलाईट कॉपर युनिट बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकल्पामुळे होणार असलेल्या प्रदूषणाने गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यासाठी स्थानिकांचे येथे निषेध आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एका व्यक्तीसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

कॉपर युनिट ऑफ वेदांता लिमिटेड या कंपनीने नुकतीच तुतिकोरिनमध्ये तांबे शुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. या प्रकल्पाला सर्व प्रकारच्या परवानग्याही मिळाल्या असून कोणत्याही नियमाचे त्यांनी उल्लंघन केलेले नाही. मात्र, स्थानिकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथे कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी शेजारी जिल्ह्यांतील पोलिसांचीही मदत घेण्यात आली.

या आंदोलनादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाल्याने डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसांच्या या कारवाईचा विरोध केला आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार, स्टॅलिन यांच्याशिवाय राज्याच्या अन्य राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.