कोलकातामध्ये सोमवारी संध्याकाळी रेल्वेच्या बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अग्निशमन दलाचे चार जवान, रेल्वे पोलीस दलाचे दोन जवान आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. इमारतीत रेल्वेची कार्यालयं आहेत. आग लागल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील बचावकार्य सुरु असताना घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

जागा कमी असल्याने आग विझवताना अडथळे निर्माण होत होते. जागा नसल्याने शिडी उभी करणं कठीण जात होतं अशी माहिती मंत्री सुजीत बोस यांनी दिली. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ही अत्यंत दुख:द घटना असून मृतांच्या कुटुंबीयांनी प्रत्येकी १० लाखांची मदत दिली जाईल असं जाहीर केलं. तसंच कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल अशी माहिती दिली.

आगीचा परिणाम तिकीट बुकिंग सेवेवर झाला होता. पूर्व भारताच्या प्रवासी आरक्षण प्रणालीचा सर्व्हर या इमारतीत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे. आग लागल्याने विद्युत प्रवाह रोखण्यात आला होता. यामुळे हे सर्व्हर डाऊन होतं. याचा परिणाना ईस्टर्न झोनच्या संपूर्ण संगणकीय तिकीट सेवेवर झाला होता.

नेमकं काय झालं
कोलकाता पोलिसांना सर्वात प्रथम सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी आगीची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून अनेक मजले रिकामी करण्यात आले असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून दखल
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.