येथून जवळच असलेल्या पीपारपूर येथे उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आग लागून नऊ ठार, तर इतर १० जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी महामंडळाची गाडी फैझाबाद येथून अलाहाबादला निघाली असता लखनौपासून १५० कि.मी. अंतरावर रामगाव खेडय़ात ही बस पेटली, असे लखनौचे पोलीस अधीक्षक हीरालाल यांनी सांगितले.
बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होते व अनेक प्रवासी बसच्या खिडक्या फोडून बाहेर पडले. ही बस आगीच्या ज्वाळांमध्ये लपेटलेली होती व नंतर १०० मीटर अंतर जाऊन ती थांबली, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काही मृतदेह जळाले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.
 उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार अमेठीचे जिल्हा दंडाधिकारी जगतराम तिवारी हे या घटनेची दंडाधिकारी चौकशी करतील. या घटनेस जबाबदार धरून फैजाबादचे आगार व्यवस्थापक संतोषकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.
 जखमींना सुलतानपूर व प्रतापगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंजिनातील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाचे संचालक मुकेश मेश्राम यांनी सांगितले की, ही आग शॉर्ट सर्किटने लागली की एलपीजी सिलिंडरने लागली याचा तपास चालू आहे.
उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.  खासदार व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.