वॉशिंग्टन : अमेरिकेत नऊ लाख लोक हिंदी  बोलतात, असे भारतीय राजनैतिक अधिकारी अमित कुमार यांनी म्हटले आहे. भारतीय दूतावासाने अमेरिका व इतर देशांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत हिंदी वर्ग सुरू केले आहेत.

दूतावासाचे अधिकारी अमित कुमार यांनी विश्व हिंदी दिवसानिमित्त दूतावासात आयोजित कार्यक्रमात सांगितले,की अमेरिकेतील बहुतांश शाळात हिंदी शिकवली जाते. अमेरिकन कम्युनिटी सव्‍‌र्हे या संस्थेच्या माहितीनुसार अमेरिकेत नऊ लाख लोक हिंदी बोलतात. भारत आता जगातील एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास येत असून हिंदी भाषा शिकण्यात लोकांना रस आहे. पर्यटनासाठी लोक भारतात जातात, त्यामुळे त्यांना जर हिंदी येत असेल तर ते  भारतातील लोकांची मने जिंकू शकतात.

अमित कुमार यांनी त्यांचा चिनी भाषा शिकण्याचा अनुभव कथन करून सांगितले,की स्थानिक लोकांची भाषा शिकल्याने अनेक दारे खुली होतात. आम्ही सुरू केलेल्या हिंदी वर्गाना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून आमचे भारतीय संस्कृती विषयक शिक्षक मोक्ष राज हे ते वर्ग घेत आहेत. हे हिंदी वर्ग मोफत चालवले जातात. गेली दोन वर्षे भारतीय दूतावास हिंदीचे वर्ग आयोजित करीत आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ व जॉर्जटाऊन विद्यापीठ यांच्याशी हिंदी प्रशिक्षणाच्या सुविधेसाठी भागीदारी करण्यात आली आहे. अमेरिकेतील नव्या पिढीला हिंदीचे ज्ञान देण्याचाही विचार आहे.