विविध हिंसक कारवायांमध्ये सहभाग : पकडण्यासाठी एकूण ६२ लाखांचे बक्षीस
तब्बल सोळा लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवाद्यांच्या कसनसूर विभागीय समितीचा सदस्य (डिव्हीसी) व जहाल नक्षलवादी सुनील उर्फ रामाजी मुनसी मट्टामी व दोन सेक्शन कमांडरसह ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या एकूण ९ नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीतील नेते हादरले आहेत.
नक्षलवाद्यांसाठी राज्य सरकारने आत्मसमर्पण योजना जाहीर करताच जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे ही योजना राबविणे सुरू केले. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, नक्षलवादी मोठय़ा प्रमाणात आत्मसमर्पण करीत आहेत. काल, शनिवारी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील संड्राच्या जंगलात तीन नक्षलवादी ठार झाल्यानंतर आज नक्षलवाद्यांच्या कसनसूर विभागीय समितीचा सदस्य सुनील उर्फ रामजी मुनसी मट्टामी, तसेच कंपनी क्रमांक ४ चा सेक्शन कमांडर शिवा उर्फ सत्तू उर्फ भीमा राजू नरोटे, त्याची पत्नी राखी उर्फ रेखा तिम्मा, कंपनी क्र. १० सदस्य मीरा देवू नरोटे, टिपागड दलम सदस्य कमला उर्फ रम्मी बाजीराम हिडको, गट्टा दलम सदस्य सोमजी उर्फ लेबू मोडी आतलामी, कसनसूर दलम सदस्य लक्ष्मण उर्फ लालू सोमा नरोटे, गट्टा दलम सदस्य दोडगे उटूगे आत्राम, गट्टा दलम सदस्य मंगू उर्फ रामजी आंदरू मट्टामी, अशा एकूण ४६ लाखांचे बक्षीस असलेल्या ९ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे या जिल्ह्य़ातील नक्षल चळवळीला जबर धक्का बसला आहे.
गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत केलेली कामगिरी, तसेच जनविश्वास संपादन केल्यामुळे नक्षलवादी मोठय़ा प्रमाणात आत्मसमर्पण करीत आहेत. सुनील मट्टामी हा १७ चकमकी, १४ ठिकाणी जाळपोळ व ९ व्यक्तींचे खून, अशा ४० गुन्ह्य़ात सहभागी होता. शिवा उर्फ राजू नरोटे हा १३ गुन्ह्य़ात, तर राखी उर्फ रेखा तिम्मा ९ गुन्हय़ात, मीरा नरोटे २ गुन्ह्य़ात, तर कमला हिडको ११ चकमकीत सहभागी होती. एक जाळपोळ व दोन हत्या प्रकरणात तिचा थेट सहभाग होता.
सोमा आतलामी २ गंभीर गुन्ह्य़ात, तर लक्ष्मण नरोटे चकमक, स्फोटसह ५ गुन्ह्य़ात, दोडगे आत्राम ३ गुन्ह्य़ात, तर मंगू मट्टामी ३ चकमकी, ५ हत्या, अशा १२ा गुन्ह्य़ात होता. मागील दीड वर्षांत पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्य़ात राबवलेली नक्षलविरोधी अभियाने, झालेल्या चकमकींमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आत्मसमर्पणाचा पर्याय त्यांच्यासाठी नवजीवन सुरू करण्याचा मार्ग ठरत आहे.
पोलिसांनी या कालावधीत नक्षल सदस्यांच्या कुटुंबांशीही साधलेला संवाद, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून केलेल्या जागृतीतून सर्वसामान्यांपासून नक्षल्यांपर्यंत या चळवळीचा फोलपणा लक्षात आला आहे. यातूनच या जिल्ह्य़ात अनेक जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण करून सुखी जीवन जगत आहे.
पती-पत्नीने एकत्रित आत्मसमर्पण केल्यास त्यांना अतिरिक्त मदत दिली जात असून नक्षलवाद्यांनी चळवळीत केलेली नसबंदी शस्त्रक्रिया पोलिसांतर्फे रिओपनिंग करून दिल्याने संतती प्राप्तीचे सुखही त्यांना लाभत आहे. त्यामुळे अशा दाम्पत्यांनी आत्मपमर्पण करून सुखी जीवन जगावे, असेही आवाहन केले आहे.