सरकारी रुग्णालयातील डिसेंबर अखेपर्यंतची संख्या

कोटा : राजस्थानच्या कोटा शहरातील जे के लोन रुग्णालयात डिसेंबरच्या अखेरच्या दोन दिवसांत ९ नवजात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे, डिसेंबरमधील एकूण मृत्युसंख्या १०० वर गेली असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

या सरकारी रुग्णालयात २३-२४ डिसेंबरला ४८ तासांमध्ये १० बालके मरण पावल्यामुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या (एनसीपीसीआर) एका चमूने येथे भेट दिली होती.

३० डिसेंबरला चार, तर ३१ डिसेंबरला पाच मुले मरण पावली. प्रामुख्याने जन्माच्या वेळी कमी वजन असल्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले. मात्र, २०१४ पासूनच्या काळात २०१९ साली या रुग्णालयात मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे; २०१४ मध्ये ११९८ मुले मरण पावली होती, असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अकाली आणि आजारी नवजात मुलांची विशेष काळजी घेणाऱ्या नवजात अतिदक्षता विभागाच्या प्रभारी डॉक्टरांना हटवण्यात आले असल्याचेही दुलारा म्हणाले. राज्यातील काँग्रेस सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार या रुग्णालयातील उपकरणांचे अद्ययावतीकरण आणि देखरेख ही कामे हाती घेण्यात आली आहेत. रुग्णालयात मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा वाहिनी बनवण्याच्या कामाचे आदेश जारी करण्यात आला असून, हे काम १५ दिवसांत पूर्ण होईल असे वैद्यकीय रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरदाना यांनी सांगितले.