अहमदाबाद येथील एका सरकारी रूग्णालयात मागील २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. कमी वजनामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे रूग्णालयातील अधिकारी सांगत आहेत. या बालकांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यासही सांगितले होते. पण त्यांना वाचवता आले नाही. या रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एम.एम. प्रभाकर म्हणाले की, ज्या बालकांना खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले. तेथील बहुतांश डॉक्टर्स हे दिवाळीच्या सुटीसाठी घरी गेले होते. ज्या बालकांचा मृत्यू झाला त्यांचे वजन खूप कमी होते. अनेक बालकांचे वजन एक किलोग्रॅम इतके होते. या बालकांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झालेला नाही, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.

दुसरीकडे आरोग्य आयुक्त डॉ. जयंती रवी यांनी बालकांच्या मृत्यूला दुजोरा देत याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले. सुरूवातीच्या माहितीनुसार काही बालकांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये काही बालकांचा मृत्यू हा सेप्टिसीमियामुळे झाला. बालकांच्या मृत्यूचे हे मोठे प्रकरण असल्याचे त्या म्हणाल्या.

रूग्णालयाच्या बाल चिकित्सा विभागच्या सहाय्यक प्रा. डॉ. अनुया चौहान म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत एका दिवसांत इतक्या नवजात बालकांच्या मृत्यूचे हे पहिलेच प्रकरण आहे. मृतांत चार मुलं आणि पाच मुलींचा समावेश होता. यातील पाच बालकांचे वजन खूप कमी होते. यांचे वजन ७०० ग्रॅम ते एक किलोग्रॅम इतके होते. तर इतर चार बालकांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे.