मनात एखादी गोष्ट करण्याची जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शन या तिन्हीच्या जोरावर माणसाने जे ठरवले आहे ते हमखास प्राप्त करू शकतो. असंच काहीसं आंध्रप्रदेश येथील ९ वर्षाच्या मुलीने करून दाखवले आहे.

अनंतपूरची रित्विका श्री, माउंट किलीमंजारो सर करणारी जगातील दुसरी सर्वात लहान आणि आशियाची सर्वात लहान मुलगी बनली आहे. तिने तिच्या वडिलांसोबत हा विक्रम साध्य केला, जे तिचे मार्गदर्शक देखील आहेत.

रित्विकाने समुद्रसपाटीपासून ५,६८१मीटर उंचीवर असलेल्या गिलमन पॉईंटपर्यंत मजल मारली. टांझानिया येथील माउंट किलीमंजारो हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे.

अनंतपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी गंधम चंद्रुडू यांनी आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये रित्विका श्रीचे अभिनंदन केले आहे.

“अनंतपूरच्या रीत्विका श्रीचे अभिनंदन, माउंट किलिमंजारो हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर सर करणारी आशियातली सर्वात लहान मुलगी हा गौरव प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन. तु अत्यंत कठीण परिस्थिती असूनही मिळालेल्या संधींच सोनं केलं आहे. अशीच प्रेरणादायी रहा,” गंधम चंद्रदू म्हणाले.