करोना उद्रेकाचा केंद्रबिंदू असणाऱ्या चीनमधून नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या वुहानमधून करोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली तेथे करोनाची बाधा झालेल्या अनेकांच्या फुफ्फुसांना विषाणूमुळे मोठं नुकसान झालं आहे. तर काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एकदा संसर्गामधून पुर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तिंनाही संसर्ग झाल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

वुहानमधील एका प्रमुख रुग्णालयाने त्यांच्याकडे उपचार घेऊन करोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या काही चाचण्या केल्या. या चाचण्यांमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोनामुळे ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाला खूप नुकसान झालं आहे. तर पाच टक्के रुग्णांना पुन्हा संसर्ग झाला आहे. वुहान विद्यापिठाच्या झोंगनन रुग्णालयातील तज्ज्ञ पेंग झियोंग यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने एप्रिल महिन्यापासून करोनावर मात करणाऱ्या १०० रुग्णांच्या चाचण्या केल्या त्यानंतर हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

फुफ्फुसांना झालं मोठं नुकसान

वर्षभर चालवण्यात येणाऱ्या या चाचण्यासंदर्भातील मोहिमेतील पहिला टप्पा जुलैमध्ये संपला. या पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांचे सरासरी वय हे ५९ वर्षे इतके होते. चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेल्या चाचणीमध्ये ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांना मोठे नुकसान झालं आहे. म्हणजेच या व्यक्तींच्या फुफ्फुसांच्या माध्यमातून होणारे श्वासोच्छवासाशीसंबंधीत कार्य पूर्वीप्रमाणे आणि सामान्य व्यक्तींप्रमाणे होत नाही.

दिसून आलेले परिणाम

पेंग यांच्या नेतृत्वाखालील गटाने रुग्णांवर अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या. यामध्ये अगदी भटकंतीचाही समावेश होता. यामध्ये असं दिसून आलं की करोनावर मात केलेले रुग्ण सहा मिनिटांमध्ये ४०० मीटर चालू शकतात. तर ठणठणीत व्यक्ती याच कालावधीत ५०० मीटरचे अंतर कापते. एवढचं नाही तर रुग्णालयामधून घरी सोडण्यात आलेल्या काही रुग्णांना तीन महिन्यानंतरही ऑक्सीजनशी संबंधित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

अ‍ॅण्टीबॉडीज झाल्या नष्ट

या चाचण्यामध्ये अशीही माहिती समोर आली की करोनाविरुद्धच्या अ‍ॅण्टीबॉडीज नष्ट होत आहेत. करोनावर मात करणाऱ्या या १०० रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांमध्ये आता करोनाच्या अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आलेल्या नाहीत. करोनाच्या न्यूक्लीक अ‍ॅसिड चाचणीमध्ये सर्वांची चाचणी नकारात्मक आली. असं असलं तरी इम्यूनोग्लोबुलिन चाचणीमध्ये पाच टक्के रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जेव्हा एखाद्या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा सामान्यपणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तयार होणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीजमध्ये पहिल्यांदा इम्यूनोग्लोबुलिन तयार होते, ज्याला आयजीएमही म्हणतात. या चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यास त्याचा अर्थ रुग्णाला करोनाची लागण झाली आहे असा काढता येतो.

अजूनही करावा लागतोय या गोष्टींचा सामना

करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती अजूनही पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाही हेच चाचण्यांमधून दिसून येत असल्याचे पेंग सांगतात. याच अहवालामध्ये अनेक रुग्ण हे मानसिक तणावाचा सामना करत आहेत. ठीक झालेल्या अनेक रुग्णांनी आजही त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत एकत्र जेवत नसल्याचे सांगितले. तर या १०० रुग्णांपैकी अर्ध्याहूनही कमी लोकं पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. वुहानमधून करोनाच्या संसर्गाची सुरुवात झाल्याने या ठिकाणावरील रुग्णांच्या या चाचणीमधून समोर आलेली माहिती अधिक महत्वाची असल्याचे सांगण्यात येते.