त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत गुरुवारी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत ९१.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजेच २००८ मध्ये ९२.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सलग पाचव्यांदा सत्तारूढ होण्याची आशा डाव्या आघाडीला वाटत आहे. त्यांची प्रमुख लढत काँग्रेसशी आहे.

मुख्यमंत्री माणिक सरकार, अर्थमंत्री बादल चौधरी, उच्चशिक्षणमंत्री अनिल सरकार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप राय बर्मन, माजी मुख्यमंत्री समीर रंजन बर्मन आणि आयएनपीटी पक्षाचे अध्यक्ष बिजय हरखनवाल यांच्यासह १६ राजकीय पक्षांच्या २४९ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद झाले.
खायेरपूर मतदारसंघातील बोधजंगनगर येथे एका झुडपातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी पाच कच्चे बॉम्ब हस्तगत केले. राज्याच्या कोणत्याही भागातून अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोनमुरा आणि धर्मनगर येथील मतदान थांबविण्यात आले होते. तथापि, मतदान यंत्रे बदलण्यात आली आणि दहा मिनिटांनी पुन्हा मतदान सुरू झाले.