एपी, यंगून

म्यानमारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडानंतर शनिवारी सुरक्षा दलांनी एका दिवसात ९० हून अधिक जणांना ठार केल्याचे वृत्त आहे. लष्कराच्या बंडानंतर म्यानमारमध्ये निदर्शने करण्यात येत असून शनिवार हा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला.

निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात येत असल्याचे वृत्त टेलिव्हिजनने दिले आहे. असे असले तरी १ फेब्रुवारीला झालेल्या लष्करी बंडाच्या विरोधात निदर्शक यंगून, मंडाले आणि अन्य शहरांत रस्त्यावर उतरले होते. ‘म्यानमार नाऊ’ या न्यूज पोर्टलने देशभरात ९१ जणांना ठार करण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. मंडालेमध्ये २९ जणांना ठार मारण्यात आले, त्यामध्ये पाच वर्षांच्या एका लहानग्याचा समावेश आहे. यंगूनमध्ये किमान २४ जणांना ठार करण्यात आले, असे वृत्तही पोर्टलने दिले आहे.

सशस्त्र दिनाच्या दिवशीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निदर्शकांना ठार करण्यात आले असले तरी जनरल मिन आँग हलेंग यांनी लष्कर जनतेचे आणि लोकशाहीचे रक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. तर सशस्त्र दलासाठी आजचा दिवस लज्जास्पद असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.

दरम्यान, म्यानमारमधील करेन नॅशनल युनियन या एका सशस्त्र वांशिक गटाने थायलंडच्या सीमेवरील लष्कराचे ठाणे उलथून टाकल्याचे म्हटले असून एका लेफ्ट. कर्नलसह १० जणांना ठार केल्याचा दावा केला आहे. या धुमश्चक्रीत गटातील एकाचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. लष्कराचे बंड झाल्यानंतर म्यानमारमध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत.  याबाबत लष्कराच्या प्रवक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.