११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर करण्यात आलेल्या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती जतन करणाऱ्या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन येत्या २१ मे रोजी करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होण्यापूर्वी ज्या जागेवर होते, त्याच जागी सदर संग्रहालय उभारले जाणार आहे.

यापूर्वी २०११ मध्ये ‘ट्विन टॉवर’च्या मूळ जागी एक कायमस्वरूपी स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या २९७७ लोकांना तसेच १९९३ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांत ठार झालेल्या सहा निरपराध्यांना श्रद्धांजली म्हणून सदर स्मारक उभारण्यात आले होते. ‘इन मेमोरियम’ या नावाने ते प्रसिद्ध आहे.
मात्र आता ‘हिस्टॉरिका’ या नावाने उभारले जाणारे दुसरे संग्रहालय मात्र यापेक्षा थोडे वेगळे असणार आहे. ११ सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनांचा, त्यांच्या विश्लेषणाचा तसेच त्यानंतर झालेल्या परिणामांचा यात वेध घेतला गेला आहे. या संग्रहालयात, हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या वस्तू, उद्ध्वस्त झालेल्या इमारतीचे अवशेष, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती तसेच ध्वनिफिती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

येत्या २१ मे पासून हे संग्रहालय सर्वासाठी खुले केले जाणार आहे. मात्र तत्पूर्वी, १५ ते २० मे या कालावधीत हल्ल्यातील हुतात्म्यांना आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
‘ज्या-ज्या व्यक्तींनी आजवर प्रत्यक्ष किंवा दूरचित्रवाहिन्यांवरून तो भीषण हल्ला पाहिला आहे किंवा त्याबद्दल ऐकले आहे, अशांना त्या हल्ल्याच्या तीव्रतेची कल्पना यावी तसेच असे हल्ले पुन्हा होऊ नयेत अशी प्रेरणा त्यांच्या अंत:करणात जागृत व्हावी, म्हणून हे स्मारक आम्ही उभारत आहोत.’
बिल दे ब्लॅसिओ, महापौर, न्यूयॉर्क