देशात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी देखील दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशाचा रिकव्हरी रेट(बरे होणाऱ्यांचे प्रमाण) ७९.६८ टक्क्यांवर पोहचला आहे. मागील २४ तासांत देशभरात ९४ हजार ६१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, मागील सलग दोन दिवस ९४ हजारांपेक्षा अधिकजणांनी करोनावर मात केलेली आहे.

देशभरात करोनामुक्त होणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ६० टक्के संख्या पाच राज्यांमधील आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा समावशे आहे. या पाच राज्यांमध्ये करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एका दिवसात २३ हजार रुग्णांना करोनावर मात केली आहे. तर, याच कालावधीत कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये १० हजारापेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार,  २४ तासांत देशात ९२ हजार ६०५ नवीन करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. तर एक हजार १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे.

करोनामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. २३ सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. गेल्या काही आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या वाढत असून या राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक होत असल्यानेच नरेंद्र मोदी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.या सात राज्यांमध्ये देशात सर्वाधिक फटका बसलेल्या दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे.