जम्मू-काश्मीर भागातील एलओसीवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ९५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. त्यांनी यावेळी हे देखील सांगितले की, भारतीय जवानांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना वेळोवेळी चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलेले आहे.

भारत सरकारने जम्म-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान अधिकच चिडलेला आहे. परिणामी पाकिस्तानकडून सर्वप्रकारे भारतविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय दहशतवाद्यांना भारताता घुसखोरीसाठी मदत देखील केली जात आहे.

पाकिस्तानकडून या वर्षात १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत तब्बल २ हजार ३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर, भारतीय जवानांकडून एलओसीवरील व काश्मीर खोऱ्यातील विविध कारवायांमध्ये १४७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली होती.

काश्मीर खोरे अशांत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान नव्या बनावट नोटांद्वारे भारताला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील माहिती समोर आली होती. याचबरोबर पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे. पाकिस्तानी सेना व आयएसआयच्या मदतीने लश्कर ए तैयबा (एलइटी), हिजबुल मुजाहिद्दीन(एचएम) आणि जैश ए मोहम्मद (जेएम) या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरसह भारताच्या अन्य काही भागात दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येत जबाबदाऱ्या वाटून घेतल्या असल्याची देखील माहिती समोर आली होती.