८ महिन्यांच्या बाळाची आईनेच गळा चिरुन हत्या केली, तर त्याच्या शरीरावर अनेक वारही केले आणि त्यानंतर स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. अत्यंत धक्कादायक आणि क्रौर्याचा कळस गाठणारी ही घटना आहे. दिल्लीतील अमन विहार भागात हा प्रकार घडला आहे. आईचे नाव सारीका असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आहे. तिने आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कबुली दिलेली नाही असेही पोलिसांनी म्हटले आहे. मात्र सारीका आणि तिचे बाळ एकटे असतानाच हा प्रकार घडला आहे त्यामुळे सारीकानेच बाळाला ठार केले असावे असे पोलिसांनी म्हटले आहे.

सारीकाची मानसिक अवस्था चांगली नाही. तिला रूग्णालयात आणले गेले तेव्हाही तिने प्रचंड गदारोळ घातला आणि मग ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेली. तिच्या बाळाला तिनेच ठार केले हे ठामपणे सांगताही येत नाही आणि ठामपणे नाकारताही येत नाही असे पोलीस अधिकारी तिवारी यांनी म्हटले आहे. तसेच या हत्येमागे नेमके काय कारण असावे हेदेखील लक्षात येत नाहीये असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.

सारीकाला मानसिक आजार आहे. तिचे उपचार दिल्लीतील रूग्णालयात सुरु असल्याचीही माहितीही पोलिसांनी दिली. चार वर्षांपूर्वी सारीकाचा मुलगा वारला त्याचा तिने धसका घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सारीकाने आपल्या बाळाचा खून करण्याचे पाऊल का उचलले असावे हे कळत नसल्याचे तिचा पती हरि शंकर याने म्हटले आहे. आमच्यात विकोपाला जाणारे कोणतेही भांडण झाले नव्हते. तिला घरातली कामे सांगितली की राग येत असे पण त्यामुळे ती मुलाला ठार करेल असे वाटत नाही असेही हरि शंकरने पोलिसांना सांगितले.

सारीका आणि तिचा मुलगा गुरुवारी दोघेच घरी होते. तिचा पती हरि शंकर काही कामानिमित्त बाहेर गेला होता. तो रात्री दीडच्या सुमारास परतला, घरी आल्यावर त्याने पाहिले की त्याच्या बाळाचे शीर जमिनीवर पडले होते. तर त्याची पत्नी सारीका बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती. त्याने तातडीने रूग्णालय गाठून तिला रूग्णालयात दाखल केले. मात्र तेव्हापासून सारीकाने नेमके काय झाले हे काहीही सांगितलेले नाही. सारीका आणि हरि शंकर या दोघांना दोन मुलीही आहेत. त्या त्यांच्या आजी आजोबांसोबत अमन विहार भागातच राहतात.

अशा घटनांबाबत नेमके भाष्य करता येत नाही, काही वेळा भास होतात. आपल्या बाळाचा आपल्याला त्रास होतो आहे असे वाटते आणि त्यातून असे टोकाचे पाऊल उचलले जाते असे मत मानसशास्त्रज्ञ रजत मित्रा यांनी व्यक्त केले आहे. पण अशा प्रकारचा गुन्हा करण्यासाठी मानसिक आजार असलाच पाहिजे असे आवश्यक नाही. अनेकदा रागाच्या भरातही टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.