ओडिशामधील महानदीमध्ये एक ५०० वर्ष जुनं मंदिर साडलं आहे. नदीच्या मुख्य पात्रामध्ये असणारा या मंदिराचा कळस व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अनेक वर्षांमध्ये नदीचा प्रवाह बदलल्याने हे मंदिर पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे.

इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चर हेरिटेजच्या (आयएनटीएसीएच) सर्वेक्षणादरम्यान हे मंदिर आढळून आलं आहे. नयाघर येथील बहापूरमधील पदमाबती गावात नदी पात्रात हे मंदिर संशोधकांना अगदी नदीपात्राच्या मध्यभागी दिसून आलं.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ६० फूटांचे हे मंदिर गोपीनाथ देवाचे आहे. गोपीनाथ हा भगवान विष्णूचा अवतार असून १५ व्या आणि १६ व्या शतकाच्या सुरुवातील या मंदिराचा कळस बांधण्यात आल्याचे प्राथमिक पहाणीमधून दिसून येत असल्याचं पुरातत्वशास्त्रज्ञचं म्हणणं आहे.

Photo: INTACH

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ११ वर्षांपूर्वीही मंदिराचा कळस दिसून आला होता. मात्र आता नदीमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुन्हा हा कळस दिसत असल्याचे गावकरी सांगतात.

Photo: INTACH

१९३३ साली आलेल्या मोठ्या पुरानंतर महानदीने आपला प्रवाह बदलला. त्यामुळे नदीच्या काठी असणारे पदमाबती हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलं. गावकऱ्यांनी मग उंच जागी नव्याने घरं बांधली आणि एकप्रकारे संपूर्ण गावानेच मूळ जागेपासून दूर पण नदीकाठीच स्थलांतर केलं. मात्र पुरानंतर दुसऱ्या जागी गाव स्थापन करताना गावकऱ्यांनी या मंदिरामधील देवता स्वत:बरोबर नेली आणि गावामधील नव्या मंदिरात स्थापन केली, असं पुरातत्वशास्त्रज्ञ असणाऱ्या पवित्रा कुमार सुबुधी सांगतात.

Photo: INTACH

गाकवऱ्यांनाही आता या मंदिरासंबंधित सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. शक्य असल्यास हे मंदिर नदीपात्रामधून बाहेर काढावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या मंदिरामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील असं गावकऱ्यांना वाटतं.

आयएनटीएसीएचने इतिहासतज्ज्ञ अनिल धीर यांच्या नेतृत्वाखाली महानदीच्या पात्रातील इतिहासाचा शोध आणि संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं आहे. याच संशोधनादरम्यान हे मंदिर सापडलं आहे.