मोबाइल फोन वापरताना तो सतत चार्ज करीत राहणे ही फार कटकटीची बाब असते. स्मार्टफोन तर खूपच बॅटरी वापरतो त्यामुळे साधारण तीन तासांनी बॅटरी बऱ्यापैकी उतरलेली असते शिवाय हे फोन चार्ज करायलाही वेळ लागतो. ते लवकर चार्ज करणारे काही चार्जर आहेत पण त्यापेक्षाही यात फोनची बॅटरी कशी आहे यावर बरेच अवलंबून असते. वैज्ञानिकांनी आता अ‍ॅल्युमिनियम भरलेल्या कॅप्सूलच्या मदतीने नवीन बॅटरी तयार केली असून ती सहा मिनिटात विद्युत भारित (चार्ज) होते. आताच्या लिथियम आयन बॅटरीपेक्षा या बॅटरीची क्षमता चार पट अधिक असून ती पटकन उतरत नाही. अ‍ॅल्युमिनियमच्या या बॅटरीत नॅनोकण (अब्जांशकण) हे टिटॅनियम डायॉक्साईड बरोबर वापरलेले असतात. अ‍ॅल्युमिनियमभोवती टिटॅनियम डायॉक्साईड असते व ते ऋणभारित इलेक्ट्रोड म्हणून काम करते. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व बीजिंगची शिंगहुआ विद्यापीठ या संस्थांच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. एका नळीत अ‍ॅल्युमिनियमच्या नॅनोपार्टिकल्सच्या कॅप्सूल असतील तर संबंधित धातू सहजपणे आकुंचन व प्रसरण पावतो असे द टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
पुनर्भारित लिथियम आयन बॅटरीमध्ये अ‍ॅल्युमिनियम वापरण्यातील अडचणी त्यातून दूर झाल्या आहेत, असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
अ‍ॅल्युमिनियमची क्षमता अधिक असते ते भारित होते व नंतर त्यातील विद्युतभार संपतो तेव्हा त्याचे आकारमान दुप्पट वाढते व कमी होते. म्हणजेच त्यात काही थर तयार होतात व नंतर ते नाहीसे होतात. थर जेव्हा पुन्हा तयार होतात तेव्हा लिथियम वापरले जात असते व त्यामुळे बॅटरीची क्षमताही कमी होते. नेचर कम्युनिकेशन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

नवीन बॅटरी
*लिथियम बॅटरीपेक्षा चौपट क्षमता.
* विद्युतभारित होण्यास सहा मिनिटे लागतात.
* अ‍ॅल्युमिनियम व टिटॅनियम डायॉक्साईडचा वापर.