दुचाकीवरुन जात असताना अंगावर केमिकल पडल्याने ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्याच्यासोबत असणारा मित्र गंभीर जखमी झाला. दिल्लीमधील जोहरी मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. अद्याप मेट्रो स्टेशन सुरु झालं नसून स्टेशनच्या पिंक लाइनवर ही घटना घडली. यानंतर तिथे उपस्थित कामगारांनी दोघांना रुग्णालयात दाखल केलं.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अमित चौहान असून 17 वर्षीय राहुल जखमी झाला आहे. राहुल दुचाकी चालवत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत अशी माहिती गाजियाबादचे पोलीस उपनिरीक्षक वैभव कृष्णा यांनी दिली आहे.

राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जोहरी मेट्रो स्टेशनजवळून जात असताना एक केमिकल आमच्या अंगावर येऊन पडलं ज्यामुळे आम्ही भाजलो गेलो. दोघांनाही तात्काळ पूर्व दिल्लीमधील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला तर राहुल याच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली मेट्रो प्रशासनाने या दुर्घटनेनंतर आपली बाजू मांडत मेट्रो स्टेशनच्या परिसरातून काही पडलं नसल्याचं सांगितलं आहे. ‘जोहरी मेट्रो स्टेशनच्या बाहेर असताना त्यांच्या अंगावर कसलं तरी केमिकल पडलं, ज्यामुळे ते जखमी झाले’, असं मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी कोणीतरी जाणूनबुजून केमिकल टाकलं असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.