डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नाताळाचा उत्साह अमेरिकेमध्ये दिसून येतो. अनेक कंपन्या डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात. काही कंपन्या आपल्या कर्चमाऱ्यांना नाताळ आणि नवीन वर्ष उत्साहात साजरे करता यावे म्हणून बोनसही देतात. सध्या अशाच एका कंपनीची जगभरात चर्चा आहे. कारण या कंपनीने नाताळानिमित्त आपल्या प्रत्येक जुन्या कर्मचाऱ्याला ३५ लाखांचा बोनस दिला आहे. यासंदर्भातील वृत्त द डेली मेलने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेमधील सेंट जॉन प्रॉपर्टीज या रियल इस्टेट श्रेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपनीने आपल्या सर्व कमर्चाऱ्यांसाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये कंपनीच्या सर्व १९८ कर्मचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलं होते. पार्टीदरम्यान सर्वांना एक लाल रंगाच लिफाफा देण्यात आला. अनेकांनी कूपन असतील वगैरे समजून हा लिफाफा उघडला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण कंपनीने “यंदा कंपनी तुम्हाला ५० हजार डॉलरचा बोनस देत आहे,” असं लिहिलं होतं. अनेकांना कंपनीने दिलेल्या या भन्नाट गिफ्टचा धक्काच बसला. अनेक महिला कर्मचाऱ्यांना तर आनंदाश्रू  अनावर झाले.

“मी जेव्हा लिफाफा उघडला तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. मी जे पाहत होते ते खरं आहे की खोटं हेच मला समजत नव्हतं. मला कसं वाटलं हे सांगण्यासाठी मला शब्दच सुचत नाहीयत. हे खरोखर भन्नाट गिफ्ट होतं. मी अजून या धक्क्यामधून सावरलेले नाही. खरोखर हे आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट आहे,” अशी प्रतिक्रिया कंपनीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या स्टेफनी रिडवे या महिलेने सीएनएनशी बोलताना दिली.

कंपनीचे मालक असणाऱ्या जॉन यांनी कंपनीने निश्चित केलेलं टार्गेट पूर्ण केल्यामुळे आपण कर्मचाऱ्यांना इतक्या मोठ्याप्रमाणात बोनस देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं. अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये कंपनीने आपली कार्यलये सुरु केली आहेत. कोणता कर्मचारी कंपनीमध्ये किती वर्ष काम करत आहे याच्या आधारे बोनस देण्यात आला आहे. त्यामुळे नुकतेच कंपनीमध्ये कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या बोनसची रक्कम ही शंभर डॉलर म्हणजेच सात हजार रुपये इतकी आहे. तर सर्वाधिक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला २ लाख ७० हजार डॉलर म्हणजेच १ कोटी ९० लाख रुपये बोनस देण्यात आला आहे. बोनस म्हणून देण्यात आलेली एकूण रक्कम ही १७ कोटी इतकी आहे.  “कंपनीच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी खास करण्याचा आमचा विचार होता. काहीतरी अवाढव्य पण तितकच उपयोगाचं असं गिफ्ट देण्याच्या उद्देशाने हा बोनस देण्यात आला आहे,” अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष असणाऱ्या लॉरेन्स मॅकरॅझ यांनी दिली आहे.

या बोनसमुळे खऱ्या अर्थाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा नाताळ सण दणक्यात साजरा होणार आहे हे मात्र निश्चित.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A boss just distributed rs 70 crores among 198 employees as surprise bonus scsg
First published on: 13-12-2019 at 10:29 IST