लग्न म्हटल्यावर मानपानाची देवाणघेवाण आलीच. मात्र मध्य प्रदेशमधील ग्वालियर आणि चंबल परिसरामध्ये या देवाण घेवाणीसंदर्भात एक वेगळीच प्रथा आहे. येथे होणाऱ्या नववधूला सासरवाडीचे लोक तिच्या इच्छेनुसार भेटवस्तू देतात. सामान्यपणे दागिणा किंवा घरातील एखादी वस्तू वधूच्या इच्छेनुसार दिला भेट दिली जाते. अशाच एका लग्नानंतर येथील २२ वर्षीय प्रियंका भदोरीया या तरुणीने तिच्या सासरच्यांकडे चक्क दहा हजार झाडे लावण्याची मागणी केली. शेतकरी असणाऱ्या आपल्या वडिलांना दुष्काळी परिस्थितीशी सतत सामना करावा लागतो, त्यांच्यासारखी अडचण इतर शेतकऱ्यांना येऊ नये म्हणून मी ही आगळीवेगळी भेट मागितली आहे असं प्रियांकाने सांगितले. विशेष म्हणजे आपल्या सुनेची ही मागणी सासरच्यांनी मान्य केली आहे.

दहा हजार झाडांपैकी पाच हजार झाडे माझ्या वडिलांच्या गावी म्हणजेच माहेरी तर पाच हजार झाडे सासरवाडीच्या गावी लावण्यात यावी अशी मागणी प्रियंकाने केली आहे. या मागणीबद्दल बोलताना प्रियंका म्हणते, ‘लहानपणापासूनच मला निसर्गाची आवड आहे. मी दहा वर्षाची असल्यापासून बिया जमीनीमध्ये टाकून माझ्यापरीने वृश्र लागवड करते. जागतिक वसुंधरा दिनाच्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिल रोजी माझे लग्न ठरल्याचा मला विशेष आनंद आहे. निसर्गाबरोबर माझे एक भावनिक नाते आहे. म्हणूनच मी लग्नाची भेट म्हणून वृश्र लागवडीची मागणी केली आहे.’ प्रियंकाची मागणी ऐकून आधी दोन्ही कुटुंबांना काय करावे ते समजले नाही. मात्र तिचा नवरा रवी चौहान याला ही संकल्पना भरपूर आवडली आणि त्याने यासाठी लगेच होकार दिला.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंकाचा थोरला भाऊ ब्रिजेश म्हणतो, ‘माझ्या बहिणीने सासरच्यांकडे हिरे आणि सोन्याच्या दागिण्यांऐवजी झाडे लावण्याची मागणी केल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.’ आधी रवी आणि त्याच्या घरच्यांनी प्रियंका काही मोजकी झाडे लावण्याची मागणी करत असल्याचे वाटले पण तिने दहा हजार झाडे तुम्ही लावावीत अशी माझी इच्छा आहे असं स्पष्टपणे सांगितल्याचे ब्रिजेश म्हणतो. प्रियंकाने रवीला या आगळ्यावेगळ्या भेटीमागील तर्क सांगितल्यानंतर रवीने लगेचेच याला होकार दिल्याचंही ब्रिजेश म्हणाला.

सध्या प्रियंकाच्या या मागणीची पंचक्रोषीमध्ये चर्चा असून अनेकांनी अशाप्रकारे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत असे मत गावकरी व्यक्त करत आहेत.