क्रिकेटर मोहम्मद शमीविरोधात हुंडाप्रकरणी छळ आणि लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे क्रिकेटर मोहम्मद शमीच्या अडचणी वाढल्या आहेत. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. या दोघांचे भांडण फक्त चव्हाट्यावरच आले नाही तर ते कोर्टातही गेले. आता याप्रकरणी मोहम्मद शमीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

२०१८ मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. हसीन जहाँने शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अॅप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता.

२०१८ मध्ये हसीन जहाँने फक्त शमीविरोधातच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला असा आरोप तिने केला होता. हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली. आता या सगळ्या प्रकरणांपैकी हुंडा मागणे आणि लैंगिक छळ करणे या दोन प्रकरणात मोहम्मद शमीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही बाब निश्चितच शमीच्या अडचणी वाढवणारी ठरली आहे.