बंद पडलेल्या सरकारी उद्योगांची विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या आमदाराने चक्क विधानसभा परिसरातच स्वतःचा हात ब्लेडने कापला. इतकच नाही तर त्याच रक्तानेच विरोधातील घोषणाही लिहिल्या. आसाम विधानसभेत मंगळवारी ही घटना घडली. रूपज्योती कुर्मी असं काँग्रेसच्या आमदाराचे नाव आहे.

रुपज्योती कुर्मी हे जोरहाट जिल्ह्यातील मरियानी मतदारसंघाचे आमदार आहेत. नागा आणि कछर पेपर मिल, ब्रह्मपुत्र व्हॅली फर्टिलायजर कॉर्पोरेशन, दिब्रगडमधील टी इस्टेट आणि करीमगंज येथील टी इस्टेट या बंद पडलेल्या कंपन्यांना विकण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला काँग्रेसचे आमदार रुपज्योती कुर्मी यांनी विरोध दर्शवला आहे.

मंगळवारी रुपज्योती कुर्मी हे विधानसभेत आले होते. विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच त्यांनी स्वतःच्या तळहातावर ब्लेडने वार केले. त्यानंतर रक्ताने सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणा लिहिल्या. “आसामी लोकांचा अभिमान आणि भविष्य समाज, मातीच्या नावाखाली विकण्याची परवानगी नाही.” असं त्यांनी लिहिले आहे.
कुर्मी यांनी कापल्यानंतर अनेक आमदारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आसाम विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिले तर कुर्मी यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते असं पोलिसांनी म्हटलं आहे.

कुर्मी यांचं म्हणणं काय?

आसामच्या धर्तीवरील सर्व संसाधने हे राज्याच्या गौरवाची बाब असून, लोकांची उपजीविका आणि राज्याच्या भविष्याशी जोडलेले आहेत. त्यांना विकण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आमच्या पक्षाने (काँग्रेस) ब्रिटिशांच्या गोळ्याही झेलल्या आहेत. आज सरकारच्या निर्णयामुळे आसाम ज्या संकटाचा सामना करत आहे, त्यासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे,” असं कुर्मी यांचं म्हणण आहे.