बिहारमध्ये धार्मिक आणि जातीय वोट बँकेचे राजकारण सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचे असते. यासाठी हे राजकीय पक्ष काय करतील याचा नेम नाही. या गोष्टीला पुष्टी देणारा एक बॅनर समोर आला आहे. पटना येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावला असून त्यावर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आणि त्याखाली त्यांच्या जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणीतील सदस्यांचे हे फोटो आहेत.


या बॅनरवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही फोटो लावण्यात आला असून त्याखाली ब्राह्मण समुदाय असे लिहीण्यात आले आहे. अल्पेश ठाकूर यांच्या फोटोखाली मागासवर्गीय तर शक्तीसिंह गोहिल यांच्या फोटो खाली राजपूत समाज असे लिहीण्यात आले आहे.

या प्रकारामुळे हा बॅनर सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून त्यातून जातीय राजकारणाचा चेहरा प्रकर्षाने समोर आला आहे. यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यावरुन काँग्रेसला टीकेला समोरे जावे लागण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा वादही उद्भवू शकतो.