ठरल्या मुहूर्तावर अक्षता पडल्या….अगदी थाटामाटात विवाहसोहळाही पार पडला…पण जेवणाच्या वेळी झालेल्या भांडणानंतर पुढच्याच क्षणी दांपत्याने घटस्फोट घेतला आणि आपापल्या घरी रवाना झाले. गुजरातमधील गोंडल येथे हा विचित्र प्रकार घडला आहे. दांपत्याने दोन महिने आधी कोर्ट मॅरेज केलं होतं. यावेळी पारंपारिक पद्धतीने लग्न करण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्र आले. मात्र भांडण झाल्यामुळे लग्न करण्यासाठी जमलेल्या मंडपातच घटस्फोट झाला.
नवरामुलगा अनिवासी भारतीय आहे. गुजरातमधील खेडा गावचा तो रहिवासी आहे. फेसबुकवरुन त्याची तरुणीशी भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. कोर्ट मॅरेज केल्यानंतर 25 जानेवारीला नवरामुलगा वरात घेऊन गोंडलला पोहोचला होता. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनीही त्यांचं जोरदार स्वागत केलं. पण जेवणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचलं. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनी मंडपातच आपापल्या वकिलांना बोलावलं आणि घटस्फोट करुन दिला.
मंडपात उडालेला गोंधळ पाहून कोणीतरी पोलिसांना कळवलं होतं. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गोंधळ थांबला पण नाराजी मात्र कायम होती. दोन्ही पक्षांनी आपापले वकील बोलावून घटस्फोट घडवून आणला. यावेळी दोन्ही पक्षांनी एकमेकांना देण्यात आलेल्या भेटवस्तूही परत केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 2:20 am