काही दिवसांपूर्वी मनोज कुमार आणि त्याच्या पत्नीला पोटभर जेवणासाठी झगडावं लागत होतं. पंजाबमधील संगरुर जिल्ह्यात एका विटभट्टीत दोघेही रोजंदारीवर काम करत होते. दिवसाला २५० रुपये कमावताना २४ तासानंतर काय परिस्थिती असेल याची त्यांना कल्पना नव्हती. चार मुलांसहित दोघेही परिस्थितीशी संघर्ष करत होते. मात्र ३० ऑगस्टची सकाळ त्यांच्या आयुष्याला पूर्ण वळण देणारी ठरली. प्रॉपर्टी एजंट आणि बँकेचे कर्मचारी रोज त्यांच्या दारावर येऊन पैसे गुंतवण्याचे मार्ग सांगत आहेत. हे सगळं होतंय कारण मनोज कुमार यांनी राज्य सरकारच्या राखी बम्पर लॉटरीत दीड कोटी रुपये जिंकले आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी मनोज कुमारने शेजाऱ्याकडून २०० रुपये उधार घेतले होते. त्यातही विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्याने हे तिकीट खरेदी केलं होतं. नशीब फळफळलं आणि मनोज कुमार एका रात्रीत करोडपती झाले.

मनोज कुमार यांनी आता आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी पैसे खर्च करण्याचं ठरवलं आहे. खासकरुन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरतूद करण्याचा विचार ते करत आहेत. लॉटरी लागण्याआधी त्यांच्या तीन मुलींपैकी मोठी मुलगी बारावीचा परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र मनोज कुमार यांनी आता तिला शिक्षणावर लक्ष केंद्रित करत पोलीस खात्यात भर्ती होण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं आहे.

मनोज कुमार यांच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांना श्वसनाचा त्रास होता. ‘माझ्याकडे जे काही पैसे होते ते सगळे मी त्यांच्या उपचारावर खर्च केले. पण त्यांना वाचवू शकलो नाही’, असं मनोज कुमार यांनी सांगितलं आहे. लॉटरी आधी लागली असती तर मी माझ्या वडिलांना वाचवू शकलो असतो अशी खंत मनोज कुमार यांनी व्यक्त केली आहे.