‘आम आदमी पक्षा’च्या मंत्रिमंडळाने दिलेल्या राजीनाम्यानंतर शनिवारी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी शिफारस दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी केली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याबरोबरच दिल्लीची विधानसभा ही बरखास्त करण्यात यावी अशी मागणी उपराज्यपालांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यासंदर्भात केंद्रीय कायदेमंत्रालयाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी ‘आप’ सरकारच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींकडे पाठविले आहेत. दिल्ली सरकारच्या राजीनाम्यानंतर उपराज्यपालांकडून राजधानीतील परिस्थितीचा तपशील राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत आता राष्ट्रपती राजवट लागू होणार किंवा फेरनिवडणुका घेण्यात येतील याबाबतच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे