पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला 48 तास उलटल्यानंतर आता भारतीय वायुदलाने राजस्थानातील पोखरणमध्ये शक्तीप्रदर्शन केलं. जैसरमेल भागात असलेल्या पोखरण या ठिकाणी वायुशक्ती 2019 चं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये भारतीय वायुदलाच्या 130 पेक्षा जास्त फायटर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरचीही उपस्थिती होती. सुखोई आणि जॅग्वार या विमानांनी त्यांची ताकद दाखवली. सुखोई 30, मिग 29, मिराज 2000, जॅग्वार, मिग 27 यांच्यासारख्या फ्रंटलाइन एअरक्राफ्टचा समावेश होता. शत्रूचा खात्मा करण्यास आम्ही सज्ज आहोत अशीच ग्वाही वायुदलाने आपल्या शक्ती प्रदर्शनातून दिली. तेजस आणि अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर रूद्र यांनीही त्यांची कौशल्यं दाखवली.

पहा व्हिडिओ

या प्रदर्शनात स्वदेशी बनावाटीच्या आकाश या विमानानेही त्याची मारक क्षमता काय आहे याचं दर्शन घडवलं. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे शक्तीप्रदर्शन करण्यात आलं ज्याची चर्चा आता प्रत्युत्तराशी जोडली जाते आहे. कारण आपल्याला ठाऊकच आहे की देशात 14 फेब्रुवारीच्या दिवशी जो हल्ला झाला त्यामध्ये चाळीस जवान शहीद झाले. या शहीद जवानांबाबत हळहळ आणि पाकिस्तानबद्दल तसेच दहशतवाद्यांबद्दलचा राग प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.

आता बस झाले हल्ले उत्तर द्या, बदला घ्या अशी मागणी होते आहे. काऊंटर अॅक्शनची मागणी पाहता आज झालेले वायुदलाचे शक्तीप्रदर्शनही महत्त्वाचे मानले जाते आहे. आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना हवाई हल्लाही केला जाणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज कऱण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर हवाई हल्ल्याने उत्तर दिले जाणार का याची चर्चा रंगली आहे.