17 September 2019

News Flash

विरोधी पक्षाच्या नेत्यांसह राहुल गांधी शनिवारी करणार काश्मीर दौरा

अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांचा पहिलाच काश्मीर दौरा

संग्रहित छायाचित्र

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधी पक्षाच्या नऊ नेत्यांसह शनिवारी काश्मीरचा दौरा करणार आहेत अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यात राहुल गांधी जम्मू काश्मीर आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी आणि आरजेडीचे नेते मनोज झा असणार आहेत.

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरच्या स्थितीबाबत जेव्हा भाष्य केलं तेव्हा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांना काश्मीर भेटीचे निमंत्रण दिले होते. राज्यातली परिस्थिती काय आहे ते समजून घेण्यासाठी काश्मीरला या असा सल्लाच मलिक यांनी राहुल गांधींना दिला होता. यानंतर आता शनिवारी राहुल गांधी जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत विरोधी पक्षाच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळच जाणार आहे. श्रीनगरमध्ये जाऊन राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष नेते तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतील. केंद्र सरकारने काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर त्यावर काँग्रेसने बरीच टीका केली होती. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही सरकारचा समाचार घेतला होता. आता सगळ्या आरोपानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी काश्मीरचा दौरा करणार आहेत. काश्मीरमध्ये जाऊन ते तिथल्य जनतेशी संवाद साधणार का? त्यांच्याशी काय संवाद साधणार? प्रसारमाध्यमांशी काय बोलणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे.

 

First Published on August 23, 2019 9:29 pm

Web Title: a delegation of opposition party leaders to visit srinagar tomorrow including rahul gandhi and others scj 81