निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भात दिल्ली कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. दिल्ली कोर्टाने आधी दिलेल्या डेथ वॉरंटनुसार 22 जानेवारीला निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात येणार होतं. मात्र डेथ वॉरंटला आव्हान देण्यात आलं ज्यानंतर 22 तारखेचं डेथ वॉरंट रद्द करण्यात आलं होतं. आता दिल्ली न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केली आहे. या डेथ वॉरंटनुसार 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणार आहे. सकाळी 6 वाजता ही फाशी दिली जाणार आहे.

या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. मात्र 22 तारखेला फाशी दिली जाणार नाही हे तेव्हा स्पष्ट झालं होतं. कारण राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यासाठी किमान 14 दिवसांचा अवधी द्यावा लागतो असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. आता कोर्टाने नवं डेथ वॉरंट काढून 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाईल असा निर्णय दिला आहे.

काय आहे निर्भया प्रकरण?

१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती.

काय असतं डेथ वॉरंट?

कोर्टाने डेथ वॉरंट जारी केलं की कोर्टाला फाशीची तारीख आणि वेळ जाहीर करावी लागते. तसेच मधला काही काळ हा आरोपींना त्यांच्या नातेवाईकांनी भेटावं म्हणून दिलेला असतो. तसंच काही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तरीही हा वेळ दिला जातो.