नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी आज दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला असून या आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागलं आहे. पोलिसांनी परवानगी दिलेली असतानाही शेतकरी दुसऱ्या मार्गाने दिल्लीत प्रवेश करत असल्याने अनेक ठिकाणी संघर्ष पहायला मिळाला. पोलीस त्या मार्गाने जाऊ देत नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत. त्यातच काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्याने परिस्थिती चिघळली आहे.

यादरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये संतप्त आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलिसाची सुटका करण्यासाठी एका शेतकऱ्याने धाव घेतली. दिल्लीत सध्या पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. एकीकडे पोलीस आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. त्यातच हा पोलीस कर्मचारी हातात सापडल्याने आंदोलक त्याच्यावर हल्ला करतील अशी भीती होती.

आणखी वाचा- दिल्ली: पोलिसांचा चक्क रस्त्यावर बसून ट्रॅक्टर परेड रोखण्याचा प्रयत्न!

पण यादरम्यान एक शेतकरी आंदोलक या पोलीस कर्मचाऱ्याला इतरांपासून वाचवत सुरक्षितपणे तेथून बाहेर नेताना दिसत आहे. दक्षिण दिल्लीमधील आयटीओ परिसरात हा प्रकार घडला. शेतकरी पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन जात असताना काही इतर आंदोलक गराडा घालतात, मात्र त्यातूनही तो त्यांना सुरक्षितपणे पुढे नेतो. अखेर इतर काही आंदोलकही पोलीस कर्मचाऱ्याला तेथून सुरक्षित नेतात.

आणखी वाचा- शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड

दुसरीकडे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून अश्रूधुराचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यांकडून बसेसची तोडफोड करण्यात आलं असून राजधानीत तणावाचं वातावरण आहे.

आणखी वाचा- दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली होती. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार होते.