उत्तर प्रदेशात माकडांमुळे एका 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माकडांनी विटा फेकून मारल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. मात्र यामुळे पोलीस अडचणीत सापडले आहेत, कारण कुटुंबीयांनी माकडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 17 ऑक्टोबरला तिकरी गावात ही घटना घडली आहे.

पोलीस अधिकारी राजीव प्रताप सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती विटांच्या ढिगाऱ्याजवळ झोपली असता काही माकडांनी विटांवर उड्या घेतल्या. यामुळे विटांचा ढीग कोसळला आणि धर्मपाल यांच्या अंगावर पडल्या. धर्मपाल गंभीर जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

मात्र धर्मपाल यांचा भाऊ कृष्णपाल सिंह यांच्या भावाने पोलिसांची माहिती फेटाळून लावली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत धर्मपाल घरात पुजेसाठी लाकडं गोळा करत असताना माकडांनी त्यांच्यावर हल्ला केलं असल्याचं म्हटलं आहे. विटा त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर मारण्यात आल्याने ते जखमी झाले आणि रुग्णालयात नेण्याआधी त्यांचा मृत्यू झाला असा त्यांचा दावा आहे.

‘आम्ही पोलिसांकडे माकडांविरोधात लेखी तक्रार दिली आहे. मात्र पोलीस हा अपघात असल्याचं म्हणत आहेत’, असं त्यांनी सांगितलं आहे. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.