|| महेश सरलष्कर

कोलकाता : तृणमूल काँग्रेस जिंकेल किंवा भाजप. निम्मी-निम्मी संधी दोन्ही पक्षांना असेल. अशी अटीतटी पश्चिम बंगालमध्ये कधी पाहायला मिळाली नव्हती. ममता दीदींच्या डोळ्यादेखत भाजपने मुसंडी मारली हे मात्र खरे.. पन्नाशीचे बतास मंडल यांनी कबुली दिली. भारत-बांगलादेश सीमेवर पेत्रापोल हे प्रमुख निर्यातद्वार आहे. पेत्रापोलला पूर्वेकडील ‘वाघा सीमा’ म्हणतात. हा भाग बानगांव-उत्तर विधानसभा मतदारसंघात असून २०१९  मध्ये बानगाव लोकसभा मतदारसंघ भाजपने जिंकलेला आहे.

उत्तर २४  परगणा जिल्ह्यात फक्त बानगाव नव्हे, इतर विधानसभा मतदारसंघातही भाजपचे अस्तित्व जाणवू लागले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातील बदुरिया विधानसभा मतदारसंघात यंदा तृणमूल काँग्रेस, काँग्रेस-डाव्यांची आघाडी आणि भाजप अशी तिहेरी लढत होणार आहे. मतदारसंघात २२ एप्रिल रोजी मतदान होईल. बदुरियाला हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास आहे. इथे २०१७ मध्ये हिंसाचार झालेला होता. या मतदारसंघात मुस्लिमांची लोकसंख्या ६० टक्के आहे. पण, यंदा लढाईत भाजप देखील आहे. काँग्रेसच्या उमेदवाराच्या व्यवस्थापन चमूतील सदस्याच्या म्हणण्यानुसार, विजयी उमेदवार जेमतेम ५-६ हजारांच्या मताधिक्याने जिंकेल, पूर्वीप्रमाणे ३०-३५  हजारांचे मताधिक्य कोणालाही मिळणार नाही!

बदुरिया मतदारसंघातील जदूरहाटी परिसरात तुलनेत हिंदू मतदार अधिक आहेत. बंगाली हिंदूंना भाजपचा पर्याय मिळाल्याचे तीस वर्षांच्या राजीवचे म्हणणे होते. भाजपचे ग्रामपंचायत सदस्य मानस काबिसी यांच्या समर्थकांपैकी राजीवही. केंद्रात भाजपचे सरकार आले, त्याचा फायदा मिळाला. आता राज्यात भाजपचे सरकार हवे. बदुरियामध्ये देखील भाजप जिंकणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आमचे ‘नेताजी’ आहेत. घोष फोन घेतात. चार तासांत ‘मदत’ मिळते, असा राजीवचा दावा होता. नंदिग्राममध्ये सुवेंदू अधिकारी ३०  हजारांच्या मताधिक्याने ममतादीदींचा पराभव करणार, हाही राजीवचा दावा होता.

काँग्रेस उमेदवार डॉ. अब्दुस सत्तार यांचे व्यवस्थापन चमूतील सदस्याचे म्हणणे होते की, डावे-काँग्रेसच्या संयुक्त आघाडीला सुमारे ७०  जागा मिळतील, तृणमूल काँग्रेस आणि भाजपला १००-१२० पर्यंत जागा जिंकता येतील. मग, तृणमूल काँग्रेस आणि संयुक्त आघाडी एकत्र येऊन पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवेल. बदुरियामध्ये भाजप जिंकू शकणार नाही, पण काही विधानसभा मतदारसंघात मतदार भाजपकडे वळू लागले आहेत.

बदुरियाचा शेजारी राखीव मतदारसंघ स्वरूपनगर, त्यापुढील गाईघाटा, बानगाव उत्तर, बानगांव दक्षिण या विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे झेंडे चहूबाजूने दिसतात. हे झेंडे मुस्लिम आणि हिंदू वस्त्यांनुसार बदलतात. डाव्यांचे वा काँग्रेसचे अस्तित्व इथे जाणवत नाही. बानगावचे खासदार शंतनू ठाकूर मतुआ समाजाचे नेते. मतुआ महासंघाचे प्रमुख. उत्तर २४ परगणाच्या पलिकडे असलेल्या नदिया जिल्ह्यातील कृष्णनगर आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघात मतुआ समाजाचे मतदार निर्णायक ठरतात. कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा विजयी झाल्या असल्या, तरी त्यांना मुस्लिमप्रभुत्व असलेल्या विधानसभा मतदारसंघातून जास्त मते मिळाली होती. कृष्णनगर महापालिका क्षेत्रातूनही मोईत्रा यांना फारशी मते मिळाली नव्हती.

कृष्णनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मुकुल रॉय यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. तृणमूलमधून रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मतुआ समाज भाजपच्या पाठीशी असल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मानला जातो.

मतुआ मतदार आणि मोदींचा बांगलादेश दौरा

पूर्वेकडील काही मतदारसंघांमध्ये मतुआ मतदार भाजपसाठी निर्णायक ठरणार असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशचा दौरा केल्याचे मानले जाते. मतुआ समाज बांगलादेशातून भारतात आलेला हिंदू समाज आहे.  त्यांच्याकडे निवडणूक ओळखपत्र आणि शिधापत्रक असले तरी त्यांना अजून नागरिकत्व मिळालेले नाही. मोदी-शहा पश्चिम  बंगालच्या प्रचारसभांमध्ये मतुआंच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणीची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा सातत्याने ठसवला जाण्यामागे मतुआंची मते हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते.