आधार कार्ड बनवण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला पकडून ठेवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अत्याचारानंतर आरोपींनी पीडित मुलीला ही बाब कोणाजवळ उघड न करण्याची धमकी देत तिला रस्त्यावर तशाच अवस्थेत सोडून दिले.

दिल्लीच्या सुल्तानपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अत्याचारानंतर पीडित मुलगी त्याच अवस्थेत रस्त्यावर भटकत असताना एका व्यक्तीने याची माहिती स्थानिक पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते तिला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी दोन जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरु केली आहे. आरोपींची नावे किशन आणि जमुना दास अशी आहेत.

स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह सुल्तानपुरी भागात राहत होती. काही दिवसांपूर्वी तिची पर्स चोरीला गेली होती. त्यामुळे पर्समध्ये ठेवलेल्या आधारकार्डसहीत अन्य कागदपत्रे हरवली होती. या मुलीची आधार कार्ड बनवणाऱ्या किशन नामक व्यक्तीबरोबर ओळख होती. एकमेकांना ते बऱ्याच काळापासून ओळखतात. त्यामुळे आधार कार्ड बनवण्यासाठी १५ डिसेंबर रोजी तिने किशनशी चर्चा केली. त्यानंतर त्याने तिला सुल्तानपुरी बस स्थानकाजवळ बोलावून घेतले.

ही तरुणी किशनच्या सांगण्यावरुन त्या संध्याकाळी सुल्तानपुरी बस स्थानकाजवळ पोहोचली. त्याठिकाणी आरोपी आपली गाडी घेऊन आला होता. तिथून तो पीडित तरुणीला घेऊन आधार कार्डच्या कार्यालयात गेला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किशनने त्या तरुणीला बांधून ठेवले आणि आपला मित्र जमुना दास याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. या ठिकाणी तिच्यावर दोघांनी मिळून अत्याचार केला. यानंतर त्या दोघांनी तिला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली आणि तिला तशाच अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले.

त्यानंतर रस्त्यावर तरुणी संशयास्पद अवस्थेत भटकता पाहून तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्या तरुणीला घेऊन रुग्णालयात गेले आणि तिच्यावर प्राथमिक उपचार केला आणि त्यानंतर तिला तिच्या घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर पोलिसांनी पीडितेच्या जबाबावर दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच लवकरच आरोपींना पकडले जाईल असे पोलिसांनी सांगितले.