देहरादून येथील बालसुधारगृहात १४ वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. या मुलीवर तिच्या आईच्या हत्येचा आरोप होता. मुलीने बालसुधारगृहातील बाथरुममध्ये गळफास लावून घेतला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ३ मे रोजी मुलीला बालसुधारगृहात आणण्यात आलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोबेशनरी अधिकाऱ्याने माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलीने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेतलं होतं. तिथेच तिने गळफास लावून घेतला. मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तिला मृत घोषित करण्यात आलं.
‘प्रथमदर्शी ही आत्महत्या असावी असं वाटत आहे, पण कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मुलगी हरिद्वार येथे आपल्या आईसोबत राहत होती. २०१८ मध्ये आईच्या हत्येच्या आरोपाखाली तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती’, अशी माहिती नेहरु कॉलनीमधील स्टेशन हाऊस ऑफिसर सुनील पनवार यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच बाल अधिकार संरक्षण राज्य आयोगाच्या प्रमुख उषा नेगी बालसुधारगृहात दाखल झाल्या होत्या. ‘मुलगी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. महिलांच्या सुधारगृहात आपली रवानगी व्हावी अशी तिची इच्छा होती. यासंबंधी अधिकृत प्रक्रिया सुरु होती, पण त्याआधीच तिने आत्महत्या केली आहे’, असं उषा नेगी यांनी सांगितलं आहे. बालसुधारगृहातील सर्वच विभागांना सतर्क राहण्याची तसंच सर्व मुलं सुरक्षित असून, त्यांना एकटेपणा जाणवत नाही ना याची काळजी घेणं गरजेचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 4:57 pm