तरुणीची भररस्त्यात छेड काढून तिचे कपडे फाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. बिहारमधील जेहंदाबाद येथे ही घटना घडली आहे. तरुणीची छेड काढली जात असताना प्रत्यक्षदर्शी मात्र तिची मदत करण्याऐवजी मोबाइलवर व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून पोलिसांच्या हाती लागली आहे. आरोपींवर कारवाईला सुरुवात केली असून दोघे अद्यापही फरार आहेत अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी नय्यर हसनैन खान यांनी घटनेचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. विशेष पथकाला व्हिडीओचीही तपासणी करण्यास सांगण्यात आली आहे, जो ऑनलाइन व्हायरल झाल्यापासून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओत तरुणी सुटका करुन घेण्यासाठी आरोपींसोबत लढा देत असल्याचं दिसत आहे. आरोपी यावेळी तिच्यावर हसताना दिसत असून, कपडे फाडत आहेत. यावेळी एका आरोपीला तरुणी लाथ मारुन लांब करण्याचा प्रयत्न करताना तो तिला उचलून घेतो. धक्कादायक म्हणजे यावेळी तिथे लोकांची गर्दी असताना कोणीही मदतीला पुढे येत नाही. ज्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला ती व्यक्तीदेखील व्हिडीओ शूट करण्याखेरीज काहीच करताना दिसत नाही.

आरोपींमध्ये अल्पवयीन तरुण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडीओत आरोपींपैकी एकाची दुचाकी दिसत असून पोलिसांसाठी तो एक सुगावा ठरला. ज्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला तो मोबाइलदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस आरोपींची ओळख पटवण्यासाठी तरुणीच्या शेजाऱ्यांशी तसंच गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. तरुणी आणि तिच्या कुटुंबियांचं समुपदेशन केलं जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी पॉस्को अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. सध्या देशभरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारांवरुन संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे.