केदारनाथ प्रलयात बेपत्ता झालेली 17 वर्षीय तरुणी पाच वर्षांनी पुन्हा आपल्या घरी परतली आहे. 2013 मध्ये केदारनाथ प्रलयात तरुणी बेपत्ता झाली होती. तरुणी मानसिक रुग्ण असून तिला पाहून तिच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. अलिगडमधील आपल्या घरी तरुणी परतली आहे. एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशीच ही घटना आहे.

चंचल असं या तरुणीचं नाव आहे. आपल्या नातीला पाहून तिच्या आजी आजोबांचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हरिश चांद आणि शकुंतला देवी यांनी हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रलय आला तेव्हा चंचल आपल्या आई-वडिलांसोबत केदारनाथला गेली होती. महापूर आला तेव्हा तिचे वडील त्यात वाहून गेले मात्र आई सुदैवाने वाचली होती. ती कशीबशी घरी पोहोचली अशी माहिती हरिश चांद यांनी दिली आहे.

चंचल बेपत्ता झाली तेव्हा फक्त 12 वर्षांची होती. काही समाजसेवकांनी तिला जम्मूमधील एका अनाथआश्रमाकडे सोपवलं होतं अशी माहिती ज्ञानेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. ज्ञानेंद्र मिश्रा अलीगड येथील एनजीओ चाइल्डलाइनचे संस्थापक असून त्यांनीच चंचलला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

ज्ञानेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या काही महिन्यांपासून चंचल अलिगड शहराबद्दल काहीतरी सांगण्याच प्रयत्न करत होती. तिला स्पष्ट बोलता येत नसल्याने कळत नव्हतं. पण ती अलिगडबद्दल बोलत असल्याचं समजत होतं’. यानंतर त्यांनी अलिगडमध्ये संपर्क साधून तिच्या कुटुंबीयांचा शोध लावला आणि भेट घडवून दिली.