स्वीडनचे टॉमस लिंडाल, अमेरिकेचे मॉड्रिक, तुर्कीचे सँकर यांचा सन्मान
नादुरूस्त किंवा आजारी झालेल्या डीएनएला पेशी खडखडीतपणे बरे कशा प्रमाणे करतात यावर महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. स्वीडनचे टॉमस लिंडाल, अमेरिकेचे पॉल मॉड्रिक व तुर्की-अमेरिकी शास्त्रज्ञ अझीझ सँकर यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या तीनही शास्त्रज्ञांना तब्बल ८० लाख स्वीडिश क्रोनर (साडेनऊ लाख डॉलर) पुरस्कारस्वरूपात मिळणार आहेत. नोबेल पुरस्कार वितरण कार्यक्रम स्टॉकहोम व ऑस्लो येथे होणार आहेत.
लिंडाल, मॉड्रिक व सँकर यांनी वैद्यकशास्त्रात क्रांतिकारी संशोधन केल्याचा उल्लेख करत नोबेल निवड समितीने या तीनही शास्त्रज्ञांचा सन्मान केला आहे. या तिघांच्या पद्धतशीर व निर्णायक संशोधनाने पेशींच्या कार्यावर नवा प्रकाश पडला असून अनेक अनुवांशिक रोगांमध्ये रेणवीय कारणे असतात हे समजले आहे. कर्करोग व वृद्धत्व यांच्यामागची प्रक्रिया उलगडली असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. डीएनएची एक रासायनिक संकेतावली असते व त्यावर माणसाचे जीवन अवलंबून असते.
जेव्हा पेशींचे विभाजन होते, तेव्हा रेणवीय यंत्रणा या संकेतावलीची पुनरावृत्ती करीत असते, ती तंतोतंत तशीच असते पण त्या यंत्रणेच्या कामात काही चूक झाली, तर काही पेशी मरतात व डीएनए नादुरुस्त होतो. प्रखर सूर्यप्रकाश व पर्यावरणीय घटकांनी डीएनएला धोका निर्माण होतो.
या प्रक्रियेत दुरुस्तीची भूमिका पार पाडणारे रेणवीय दुरुस्ती संच असतात, ते संकेतावलीचे वाचन करून डीएनएची संकेतावली दुरुस्त करतात. लिंडाल यांनी या दुरुस्त्या करणाऱ्या वितंचकांचा शोध लावला आहे. तुर्कीतील सावूर येथे जन्मलेले सँकार यांनी अतिनील किरणांनी डीएनएची जी हानी होते ती दुरुस्त करण्याची यंत्रणा शोधून काढली आहे तर मॉड्रिच यांनी डीएनए शिवण्याची प्रक्रिया शोधून काढली आहे.