चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाविरोधात आक्षेपार्ह ट्विट करुन त्यांची खिल्ली उडवणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात ट्विटरने कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता माहिती संरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संसदीय संयुक्त समितीने ट्विटरला विचारला आहे. रिपलब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भातली काही ट्विट्सही केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले होते. आता माहिती संरक्षणसाठी नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त समितीने याबाबत ट्विटरला प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा- “ना वकील, ना माफी, ना दंड….,” सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामराचं ट्विट

काय आहे प्रकरण?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. दरम्यान सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केल्यानंतर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने काही वादग्रस्त ट्विट्स केली होती. याच प्रकरणात आता पुण्यातील दोन वकिलांनी थेट भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलकडे यासंदर्भात तक्रार केली असून संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणालवर कारवाई करण्याची मागणी या वकिलांनी केली.

काय म्हणाला होता कुणाल कामरा?

कुणालने न्या. चंद्रचूड यांची तुलना विमानातील कर्मचाऱ्यांशी केली होती. न्या. चंद्रचूड हे विमानातील कर्मचाऱ्याप्रमाणे आहेत जे प्रथम दर्जातील प्रवाशांना शॅम्पेन सर्व्ह करत आहेत. मात्र दुसरी सर्वसामान्यांना विमानात प्रवेश मिळेल की नाही हे ही ठाऊक नाही, अशा अर्थाचे ट्विट कुणालने केलं होतं. अन्य एका ट्विटमध्ये कुणालने, वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला आणि न्यायमुर्तींना सन्माननीय म्हणणे सोडून द्यावे कारण सन्मान त्या वास्तूमधून कधीच निघून गेला आहे, अशी टीका केली होती. याचबरोबर कुणालने इतरही काही ट्विट केले होते ज्यामधून त्याने सर्वोच्च न्यायालय आणि भाजपावर टीका केली होती.