मध्य प्रदेशातील भिंद जिल्ह्यात एका पत्रकाराची अंगावर ट्रक घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप शर्मा असं या पत्रकाराचं नाव असून न्यूज वर्ल्ड चॅनेल या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून ते काम करत होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संदीप शर्मा यांनी दोन पोलीस अधिका-यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी पोलीस सुरक्षेची मागणीही केली होती.

पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी लिहिलेल्या पत्रात संदीप शर्मा यांनी उपविभागीय पोलीस अधिका-याचं बेकायदेशीर वाळू उत्खनन करणा-या माफियांसोबत साटंलोटं असल्याचा आरोप केला होता.

‘कलम ३०४ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यु झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती भिंदचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत खरे यांनी दिली आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे असंही प्रशांत खरे यांनी सांगितलं. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढलेल्या ट्रक ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.

घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांची सुरक्षा आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे. ‘पत्रकारांची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे आणि गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली जाईल’, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ‘त्यांची भरदिवसा हत्या झाली आहे. सीबीआय चौकशीशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि भाजपाच्या शासनात तो चिरडला जात आहे’, अशी टीका त्यांनी केली.