शाळा संपली की अनेकांना वेध लागतात ते कॉलेजमधील आयुष्याचे. शाळकरी जीवनातून कॉलेज तरुण होण्याचा तो प्रवास अनेकांसाठी उत्सुकता निर्माण करणारा असतो. अशावेळी अनेकांनी आपल्या प्राथमिकता ठरवलेल्या असतात. म्हणजे अनेकजण आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी कोणत्या शाखेत अॅडमिशन घ्यायचं हे आधीपासूनच ठरवतात. प्रत्येकाने कॉलेजमध्ये गेल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टीला महत्वं द्यायचं हे कुठे ना कुठेतरी ठरवलेलं असतं. पण चीनमधील एका तरुणाच्या डोक्यात मात्र काही वेगळ्याच कल्पना आहेत.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका चीनी तरुणाने बीजिंगमधील महिला विद्यापीठात प्रवेश मिळावा अर्ज केला आहे. एवढ्यावरच आश्चर्य वाटत असेल तर थांबा कारण त्याने ज्या कारणासाठी अर्ज केला आहे ते कारणही तितकंच आश्चर्यकारक आहे. आपल्याला गर्लफ्रेंड मिळणं सोपं जाईल या एकमेव कारणासाठी तरुणाने महिला विद्यापीठात अर्ज केला आहे.

हे विद्यापीठ महिला महासंघाकडून चालवलं जातं, जिथे वर्षाला १५०० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. यामध्ये १ टक्के जागा पुरुष विद्यार्थ्यांसाठी राखीव असते. आणि चीनमधील या तरुणाची आपल्याला या कोट्यात जागा मिळावी अशी इच्छा आहे.

तरुणाने एका व्हिडीओमधून आपली ही इच्छा बोलून दाखवली असून व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘या विद्यापीठात खूप मुली आहेत. जर मी येथे शिकलो तर साथीदार शोधणं सोपं जाईल’, असं तरुण व्हिडीओत सांगताना दिसत आहे. चीनमध्ये मुलींची संख्या कमी असून जन्मदरात तफावत आहे. प्रत्येक १३० मुलांमागे १०० मुली आहेत.

हा व्हिडीओ एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड केला होता. विद्यापीठाने परवानगी दिल्यानंतर हा व्हिडीओ ऑनलाइन रिलीज करण्यात आला. तरुणाचे वडिल मात्र आपल्या मुलाच्या या निर्णयाने नाराज असून त्याच्याभोवती मुलींचा गोतावळा असावा अशी आपली मुळीच इच्छा नसल्याचं ते बोलले आहेत.