निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळावे म्हणून ८ महिने कार्यालयाचे खेटे मारणाऱ्या आजोबांनी अखेर पेन्शन मिळावे म्हणून कार्यालयात किंग कोब्रा नाग आणला. कर्नाटक येथील गडग या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकाने अखेर हा जालीम उपाय निवडला. मागील ८ महिन्यांपासून त्यांच्या पेन्शन मिळण्याच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही. गडग जिल्ह्यातील रोना भागात राहणाऱ्या माबू साबा राजेखान यांनी हा उपाय निवडला. ८ महिन्यांपासून पेन्शन मिळत नसल्याने माबू यांनी किंग कोब्रा गळ्यात घालून आंदोलन केले.

पेन्शन कार्यालयाच्या अनेक फेऱ्या त्यांनी इतके दिवस मारल्या. पेन्शनसाठी माबू यांनी बँक, गॅझेटेड अधिकारी आणि पोस्टातही फेऱ्या मारल्या. मात्र त्यांना कोणीही मदत केली नाही. खूपदा कार्यालयात, बँकेत खेटे मारूनही काहीही उपाय उरला नाही म्हणून कोब्रा घेऊन कार्यालयात आले. पेन्शन द्या नाहीतर पाहा काय होते असे त्यांनी म्हणताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पळता भुई थोडी झाली. हा गोंधळ टाळण्यासाठी गॅझेटेड अधिकारी पुढे आले त्यांनी राजेखान यांना तीन ते चार दिवसात पेन्शन देतो असे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यानंतर राजेखान यांनी नाग सोडून दिला.