पोलिसांनी तपासणीसाठी गाडी थांबवल्याने एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कागदपत्रं तपासणीसाठी गाडी थांबवली होती. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता”.

गौतम बुद्ध नगरचे एसएसपी वैभव कृष्णा यांनी सांगितल्यानुसार, “तपासणी सुरु असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. आम्ही चौकशी केली असता पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोणतीही गैरवर्तवणूक झाली नसल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना मधुमेहाचा त्रास होता या माहितीला दुजोरा दिला आहे. हे प्रकरण गाजीयाबाद पोलिसांच्या अख्त्यारित येत असून आम्ही त्यांना पुढील कारवाईसाठी कळवलं आहे”.

मात्र पीडित व्यक्तीच्या वडिलांनी आपल्या मुलाने कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नव्हतं. पोलीस कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळेच आपल्या मुलाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. नवीन वाहतूक कायद्याच्या नावाखाली पोलिसांनी गैरवर्तवणूक केल्याचा आऱोप त्यांनी केला आहे.

“माझा मुलगा कार चालवत होता. यावेळी मी त्याच्या बाजूला बसलो होतो तर माझी पत्नी मागच्या सीटवर होती. आम्ही सीटबेल्ट घातला होता. तरीही पोलिसांनी लाठी दाखवत गाडी थांबवली. माझ्या मुलाने गाडी थांबवली. पण त्याला धक्का बसल्याने तिथेच कोसळला. आम्ही त्याला रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता,” अशी माहिती वडिलांनी दिली आहे.

“कोणतीही गोष्ट करण्याची एक पद्दत असते. वाहतुकीचे नियम बदलले आहेत ही गोष्ट चांगली आहे. पोलिसांनी शिस्तबद्धपणे तपासणीसाठी बाजूला येण्याची विनंती केली पाहिजे. हे कोणतंही बेरकारपणे कार चालवण्याचं किंवा इतर कोणतं प्रकरण नव्हतं. दोन ज्य़ेष्ठ नागरिक कारमध्ये बसले होते. पण तरीही त्यांनी काठीचा वापर केला. तपासणी करण्याची ही पद्धत नाही. कोणताही नियम याची परवानगी देत नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.