दिल्ली पोलिसांनी आपल्याच मित्राची हत्या करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मित्राच्या पत्नीसोबत लग्न करण्यासाठी त्याने मित्राची हत्या केली होती. मित्राच्या डोक्यावर विटेने वार करत आधी त्याने त्याला बेशुद्द केलं आणि त्याच परिस्थितीत रेल्वे ट्रॅकवर सोडून दिलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुलकेश याने रात्री दलबीरला फोन करुन बोलावलं होतं. झकीरा येथील रेल्वे ट्रॅकजवळ तो दलबीरला घेऊन गेला. यावेळी त्याने दलबीरच्या डोक्यावर विटेने वार केला ज्यामुळे तो बेशुद्द पडला. यानंतर आरोपी गुलकेशने दलबीरचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून दिला. जेणेकरुन मृतदेहाचे तुकडे व्हावेत आणि पोलिसांना आपला पत्ता लागू नये.
हत्या केल्यानंतर गुलकेशने पोलिसांना फोन करुन रेल्वे ट्रॅकजवळ आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती दिली. तपासादरम्यान त्याने पोलिसांना गंडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
‘तपासादरम्यान आरोपी गुलकेशचा मोबाइल तपासण्यात आला. त्याचा कॉल रेकॉर्डही चेक करण्यात आला. यानंतर मात्र आरोपीने गुन्हा कबूल करत आपले पीडित व्यक्तीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. त्याला पीडित मित्राच्या पत्नीसोबत लग्न करायचं होतं. पण ती मात्र लग्नास तयार होत नव्हती. यामुळेच तिने लग्न करावं यासाठी मित्राचाच काटा काढायचं त्याने ठरवलं’, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस यामध्ये पीडित व्यक्तीच्या पत्नीचा काही सहभाग होता का यादृष्टीनेही तपास करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 12:58 pm